श्री समर्थ रामदास स्वामी

श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी (ता. अंबड, जि. औरंगाबाद) शके १५३० (सन १६०८) मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. जांब ही समर्थांची जन्मभूमि, पंचवटी क्षेत्र ही त्यांची तपोभूमि आणि अखिल भारत ही कर्मभूमि होती. सन २००८ च्या रामनवमीस त्यांची ४०० वी जयंती होती.

समर्थांच नाव नारायण. सूर्याजिपंत ठोसर हे त्यांचे वडील, आणि राणूबाई या त्यांच्या मातोश्री. नारायण सात वर्षाचा असतांनाच सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण हा मुलगा लहानपणापासूनक विरक्त होता. इतरांहून वेगळा होता. अतिशय बुध्दिमान आणि निश्चयी होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. "काय करीत होतास" असे विचारल्यावर "आई, चिंता करितो विश्वाची" असे उत्तर याने दिले होते..

शेके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला. (यास कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही. कृपया कोणतीही अनौतिहासिक माहीती यात घुसडू नये ही विनंती) महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय. समाजाविषयीच्या अपार तळमळीतून समर्थांनी विपुल वाड.मय निर्मिति केली. रोखठोक विचार, साधी सरळ भाषा आणि स्पष्ट निर्भीड मांडणी ही त्यांची वैशिष्टये होती. दासबोध, मनाचे श्लोक, करूणाष्टके, भीमरूपी स्तोत्र, 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची' ही गणपतीची आरती, 'लवथवती विक्राळ ब्रम्हांडी माळा' ही शंकराची आरती, कांही पदे इत्यादि त्यांच्या कृति प्रसिध्द आहेत.

या शिवाय, दासबोध, रामायणांतील किष्किंधा, सुंदर व युध्द ही कांडे, कित्येक अभंग, आरत्या, भूपाळ्या, पदे, स्तोत्रे, राज-धर्म, क्षात्र-धर्म, शिवाजीमहाराज, संभाजीमहाराज यांस पत्रे, आपल्या शिष्यांना मार्गदर्शन, मठ आणि त्यांतील उत्सव यांसंबंधी मार्गदर्शन, आत्माराम, अन्वय-व्यतिरेक, वैराग्य-शतक, ज्ञान-शतक, उपदेश-शतक, षडरिपु-विवेक इत्यादि विपुल लेखन समर्थांनी केले आहे.

समर्थांची शिकवण कशी व्यावहारिक शहाणपणाची, सावधानतेची, आत्म-विश्वास उत्पन्न करणारी, रोखठोक आणि राजकारणी स्वरूपाचीही होती, हे त्यांच्या पुढील कांही वचनांवरून दिसून येइल.


समर्थ म्हणतात -


१. आधी संसार करावा नेटका | मग घ्यावें परमार्थ-विवेका ||

२. मराठा तितुका मेळवावा | आपुला महारष्ट्रधर्म वाढवावा ||

३. जो दुस-यावरी विश्वासला | त्याचा कार्यभाग बुडाला ||

४. आहे तितुकें जतन करावे | पुढें आणिक मिळवावें ||

५. धटासी आणावा धट | उत्धटासी पाहिजे उत्धट | खटनटासी खटनट | अगत्य करी" ||

६. धर्मासाठी मरावें | मरोनी अवघ्यांसी मारावें | मारितां मारितां घ्यांवें | राज्य आपुलें ||

७. केल्याने होते आहे रे आधी केलेंचि पाहिजें ||

८. आधी केलें | मग सांगितलें ||

९. सामर्थ्य आहे चळवळेचें | जो जो करील तयाचें | परंतु तेथे भगवंताचें | आधिष्ठान पाहिजे ||

१०. देव मस्तकीं धरावा | अवघा हलकल्लोळ करावा | मुलुख बडवा कां बडवावा | धर्मसंस्थापनेसाठी ||

This article is issued from Wikibooks. The text is licensed under Creative Commons - Attribution - Sharealike. Additional terms may apply for the media files.